

तुळजापूर : तुळजापूर शहरात पोलीस स्टेशनच्या डाव्या बाजूस असणाऱ्या वस्तीमध्ये अचानकपणे सायंकाळी सात वाजता लागोपाठ चार-पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. तुळजापूर शहरात नगरपरिषदेच्या व पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ पत्राच्या शेडमध्ये राहणाऱ्या घरामध्ये हे स्फोट झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तुळजापुरातील क्रांती चौक येथे अंडे विक्री करणारा गाडा चालवणारे सलीम शेख आणि त्यांच्या शेजारचे चार घरांमध्ये आज पसरली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्यामधून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि घरामध्ये अन्य असणाऱ्या सिलेंडरचा देखील पाठोपाठ स्फोट झालेला आहे.
आजूबाजूच्या लोकांनी यादरम्यान मदत कार्य केले परंतु स्फोट झाल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे, पुजारी संजय पेंदे, व्यापारी सतीश फत्तेपुरे यांच्यासह अन्य लोकांनी मदत कार्य केले आहे. बाजूला पोलीस स्टेशन होते परंतु अचानकपणे झालेल्या स्फोटामुळे पोलीस देखील आपला जीव मुठीत धरून बाहेर पडले.
दरम्यान एवढ्या मोठी घटना घडली तेव्हा घरामध्ये कोणीही नसल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. हे कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले होते. त्यामुळे परमेश्वरानेच आम्हाला वाचवले अशी प्रतिक्रिया या कुटुंबीयांनी दिलेली आहे.
घटनास्थळी अग्निशामक दल पोहचले असून आग विझवायचे काम सुरू आहे. स्फोट झाले त्या क्षणी विद्युत प्रवाह बंद पडला आणि अंधारात पसरला आहे. आजूबाजूला राहणारे लोक अंधारामध्ये आरडा ओरड करून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.