

तुळजापूर : कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधत राज्यासह परराज्यातून किमान 10 लाखांहून अधिक भाविकांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 7 ऑक्टोबर) तुळजापुरात हजेरी लावली. ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करीत शेकडो मैल चालत येऊन भक्तांनी तुळजापूर वारी पूर्ण केली. पौर्णिमेचा उपवास मातेचा छबिना पाहून सोडला.
सोमवारी दुपारपासूनच पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक दाखल झाले. मंगळवारीही ओघ सुरूच होता. दुपारी सोलापुरच्या मानाच्या काठ्या दाखल झाल्या. रात्री सोलापूर येथील मानाच्या काठ्यांसह निघणार्या मातेच्या छबिना मिरवणुकीनंतर अनेक श्रद्धाळू पौर्णिमेचा उपवास सोडून परतीच्या प्रवासाला निघतात. वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला.
गेल्या गुरुवारी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली मातेची श्रम निद्रा सोमवारच्या उत्तररात्री पूर्ण होऊन मुर्तीची मंगळवारी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. पाच दिवसानंतर मुर्तीला पंचामृत अभिषेक सुरू झाले. मातेच्या नित्य पूजेची घाट सकाळी 6 वाजता झाली. अभिषेकाच्या निमित्ताने हजारो भाविकांना थेट गाभार्यातून दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. मंदिराचे महाद्वार व परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता. भाविकांनी मुख दर्शनाचाही लाभ घेतला.