

तुळजापूर : तुळजापूर नवीन बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे दोन चाकी वाहनांचे दररोज आठ ते दहा अपघात होत आहेत, ही अपघाताची मालिका मागील वर्षभरापासून सुरू आहे. परंतु प्रशासनाने याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शेकडा अपघात झाल्यानंतर देखील यंत्रणा काम करत नाही, त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना आणि शहरातील नागरिकांना या नालीच्या घाण पाण्यामधून यातायात करावी लागते आहे. याशिवाय दोन चाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. या परिसरात आमदार राणाजगजित पाटील यांचे कार्यालय असून देखील या कामाबाबत उदासीनता आहे.
तुळजापूर नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गलथान कारभारामुळे तुळजापूर नवीन बस स्थानकासमोर दोन्ही बाजूंनी राज्य शासनाने मंजूर केलेला सर्विस रोड झालेला नाही. परिणामी या सर्व जागेवर लोकांनी अतिक्रमण केले आहे आणि गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. ही बाब सर्वांना माहित असून देखील सर्व यंत्रणा मूग गिळून गप्प बसले असून त्याचा फटका सामान्य माणसांना बसतो आहे. या रस्त्यावर दोन चाकी वाहनाचे दररोज दहा ते पंधरा अपघात होत असून लोक जायबंदी होऊन दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ आली आहे.
या संदर्भात यापूर्वी देखील काही नागरिकांनी यंत्रणेकडे तक्रारी केल्या परंतु आजपर्यंत याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद तुळजापूर यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत या मार्गावर मंजूर असलेला रस्ता आणि सर्विस रोड याचे काम अपूर्ण राहिले आहे. याच्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध असून देखील खर्च केला गेला नाही. यासंदर्भात स्थानिक लोकांच्या अडचणी आणि या भागात झालेल्या अतिक्रमण यामुळे संबंधित यंत्रणा काम करत नाहीत, असे आजपर्यंत दिसून आले आहे. या प्रश्नांमध जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित यंत्रणेला तातडीने सर्विस रोड करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.