Tuljabhavani Navratra | ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात तुळजापुरात घटस्थापना!

पारंपरिक विधीनी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ, भाविकांची मोठी गर्दी
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पारंपारिक पध्‍दतीने देवीची पुजा बांधली होती.  मंदिरात मोठ्या उत्‍साहात घटस्‍थापना झाली.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पारंपारिक पध्‍दतीने देवीची पुजा बांधली होती.  मंदिरात मोठ्या उत्‍साहात घटस्‍थापना झाली.
Published on: 
Updated on: 

तुळजापूर : संबळाचा कडकडाट, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंहगाभाऱ्यात रविवारी दुपारी बारा वाजता घटस्थापनेचा विधी पारंपरिक पद्धतीने झाला. यासह नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाला यानिमित्ताने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक घटस्थापनेचे यजमानपद भूषविले. मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी वातावरण मंगलमय झाले होते. घटस्थापनेनिमित्त आ. राणाजगजितसिंह पाटील आणि नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. घटस्थापनेसाठी तुळजापूरमधील धान्याचे मानकरी प्रफुल्लकुमार शेटे यांच्या कुटुंबीयांकडून जवस, करडई, मूग, ज्वारी, गहू, मका आणि सातू या सप्तधान्यांचा पुरवठा करण्यात येतो. देवीला अर्पण करण्यात येणारी नागवेलीच्या पानांची पहिली माळ घटावर वाहिली जाते. घटस्थापनेनंतर मंदिर संस्थानच्या वतीने ब्राह्मणांना पाठ, हवन आणि अनुष्ठानासाठी वर्णी दिली जाते.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थान, पोलीस, नगरपरिषद, महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागांसह राज्य परिवहन महामंडळाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत मोठ्या संख्येने भवानी ज्योतींच्या यात्रा येथून मार्गस्थ झाल्या. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली. 

यावेळी आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, सौमय्याश्री पुजार, तहसीलदार माया माने, महंत तुकोजी बुवा, चिलोजी बुवा, बजाजी बुवा, वाकोजी बुवा, हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांच्यासह पुजारी बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवरात्र महोत्सवासाठी यंत्रणा सज्ज

नवरात्र महोत्सवासाठी मंदिर प्रशासनासह पोलीस, महसूल, नगरपरिषद, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. भाविकांना दर्शनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे. भवानी ज्योतींच्या यात्रांचा ओघ सुरू असून, पहिल्या दिवशी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news