

तुळजापूर : दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात मोठी गर्दी दिसून येत आहे. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी घाटशीळ वाहनतळाकडील बीडकर पायरीकडून थेट दर्शन मंडपात भाविक सोडण्याचे नियोजन केले आहे. महाद्वारातून मात्र 500 रुपयाचे दर्शन पास घेणाऱ्या भक्तांना सोडण्यात येत आहे.
मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. किरण पुजार यांनी शुक्रवारी सिद्धिविनायक मंदिरानजीकच्या निंबाळकर दरवाजातून दाटीवाटीत मंदिरात प्रवेश करीत गर्दीचा अनुभव घेतला. त्यानंतर त्यांनी लगेच आदेश काढून दोन दिवस बीडकर पायरीकडून भाविकांना मंदिर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.
शनिवारी गर्दी नव्या मार्गाकडून काढण्यात आल्याने महाद्वाराच्या परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. मध्यरात्री एक वाजल्यापासून दोन दिवस भाविकांना बीडकर पायऱ्यामार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे. धर्म व मुख दर्शन व्यवस्था सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर दिवशी 200 रुपयाचे सामान्य पास व रेफरल पास बंद करण्यात आले आहेत. सिंहासन,अभिषेक पास व रुपये 500 रुपयाचे दर्शनपास प्रशासकीय कार्यालयाच्या तळमजल्यातून वितरीत करण्यात येवून त्या भाविकांना राजेशहाजी महाद्वारातून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत आहे.