तुळजापूर : श्रावण मासातील तिसरा सोमवार, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा अशा त्रिवेणी संगम योगावर सोमवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेचे चांदीचे सिंहासन, गाभारा विविधरंगी फुले, श्रीफळ, सफरचंद, मोसंबी, डाळींब, मक्याचे कणीस अशा विविध फळं, फुलांनी सजविण्यात आला.
राज्यासह परराज्यातून हजारों भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.यानिमित्ताने मातेचे गोजिरे रूप खूपच खुलून दिसत होते.पहाटेपासूनच मातेच्या मुख, धर्म आणि अभिषेक दर्शन रांगेत भक्तांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वहात होता. पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारपासून सलग तीन दिवस मातेची छबिना मिरवणूक पार पडणार आहे. रविवारी सायंकाळी मंदिर परिसरात पार पडलेल्या छबिना मिरवणुकीत हजारोंचा सहभाग पहावयास मिळाला. सोमवारी सायंकाळीही मातेची छबिना मिरवणूक हर्षोल्लासात पार पडली.