Dharashiv News : शेकडो वर्षांची परंपरा जपणारा तुळजाभवानी मातेचा मानाचा पलंग भूमनगरीत दाखल !

कसबा विभागात जल्लोषात स्वागत; पेठ विभागात विसावा, दर्शनासाठी भाविकांची ठिकठिकाणी गर्दी
Dharashiv News
Dharashiv News : शेकडो वर्षांची परंपरा जपणारा तुळजाभवानी मातेचा मानाचा पलंग भूमनगरीत दाखल !file photo
Published on: 
Updated on: 

Tulja Bhavani Mata bed preserves hundreds of years of tradition, arrived Bhum.

भूम, पुढारी वृत्तसेवा शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात आई तुळजाभवानी मातेच्या मानाच्या पलंगाचे शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी अष्टमीच्या दिवशी भूमनगरीत आगमन झाले. अहिल्यानगर येथून तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या या मानाच्या पलंगाचे भूम शहरातील कसबा विभागात भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत केले. मानाचा पलंग शहरात दाखल होताच 'आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. वर्षानुवर्षे अखंडपणे जपल्या जाणाऱ्या या पारंपरिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Dharashiv News
Tuljabhavani Navratri Festival : श्री तुळजाभवानी मातेची ‘भवानी तलवार’ अलंकार महापूजा

मानाच्या पलंगाचे भूमनगरीत आगमन होणार असल्याने भाविकांमध्ये सकाळपासूनच उत्सुकता होती. पलंग दाखल होताच पारंपरिक पद्धतीने त्याचे स्वागत करण्यात आले. आईच्या मानाच्या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनीही गर्दी केली होती. ठिकठिकाणी भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले. नवरात्रोत्सवातील या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसबा विभागातून पेठ विभागाकडे प्रस्थान मानाच्या पलंगाचे सेवेकरी महादेव चव्हाण, बापू कुंभार, महेश बागडे, सुधाकर झील आदी सेवेकरी डोक्यावर मानाचा पलंग घेऊन पारंपरिक मार्गाने पुढे मार्गस्थ झाले. कसबा विभागातील देवीच्या मंदिरात दर्शन व स्वागताचा सोहळा पार पडल्यानंतर पलंगाने पेठ विभागाकडे प्रस्थान केले. पेठ विभागातील गोंधळी यांच्या घरापासून तेली यांच्या खुटापर्यंतच्या ठिकाणी पलंगाचा पारंपरिक विसावा घेतला जातो.

या वेळीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भूम शहरातील मुक्काम व पारंपरिक विसाव्यानंतर मानाचा पलंग पुढील प्रवासासाठी तुळजापूरच्या दिशेने मार्गस्थ होतो. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवातील विविध धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि सीमोल्लंघनाच्या परंपरा अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने जपल्या जात आहेत. देवीच्या धार्मिक विधींसाठी लागणारा मानाचा पलंग आणि पालखी आणण्याची परंपराही याच श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. या मानाच्या पलंगाचा संबंध अहिल्यानगर शहराशी असून, पलंग आणण्याचा मान नालेगावातील पलंगे यांच्याकडे, तर पालखीचा मान बुन्हाणनगर येथील भगत यांच्याकडे असल्याची परंपरा आहे.

घटस्थापनेच्या दिवशी पलंग अहिल्यानगरमधील तुळजाभवानी मंदिरात दाखल होतो. त्यानंतर भिंगार येथील हनुमान मंदिर परिसरात पलंग आणि राहुरी येथे तयार झालेल्या देवीच्या पालखीचा भेट सोहळा पार पडतो

Dharashiv News
Tuljapur : सप्तमीला भाविकांचा महापूर; दोन लाख जणांनी घेतले दर्शन

अनेक गावांचा सहभाग: तुळजापूरकडे भक्तिमय प्रवास

मानाचा पलंग तुळजापूरकडे घेऊन जाण्याच्या या पारंपरिक प्रवासात अहिल्यानगर जिल्ह्यातील खुटेफळ, चिंचोडी पाटील, सय्यदपीर आणि कुंडी या गावांतील मानकरी सहभागी होतात. नगर, भिंगार, जामखेड, बीड जिल्ह्यातील आष्टी, भूम, चिलवडी आणि आपसिंगा या मार्गाने प्रवास करत दसऱ्याच्या आदल्या दिवशी मानाचा पलंग तुळजापूर येथे दाखल होतो. या संपूर्ण प्रवासात गावोगावी मानाच्या पलंगाचे स्वागत केले जाते. भाविक भक्त दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहतात. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम घडविणारा हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून अनेक पिढ्यांना जोडणारा सांस्कृतिक वारसा आहे. भूम शहरात मानाच्या पलंगाचे झालेले जल्लोषपूर्ण स्वागत आणि दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी यामुळे नवरात्रोत्सवातील भक्तिमय वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले. आधुनिक काळातही पिढ्यान् ‌पिढ्या चालत आलेल्या या परंपरेचे जतन होत असल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news