Tulja Bhavani Devi : तुळजाभवानी मातेची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

भक्तांची गर्दी, वैदिक होमास पूर्णाहुती, आज अजाबलीचा धार्मिक विधी
Tulja Bhavani Devi
तुळजाभवानी मातेची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Published on: 
Updated on: 

संजय कुलकर्णी

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्तीदेवता श्री तुळजा भवानी मातेची सोमवारी दुर्गाष्टमीदिवशी सकाळी पंचामृत अभिषेक व मातेची नित्योपचार पूजा पार पडताच महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात आली.मातेच्या शेवट विशेष अवतार पूजेचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध व महिलांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

सकाळी ६ वाजता मंदिरातील होमकुंडावर शतचंडी होमास प्रारंभ झाला.यजमान म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार व पत्नी सौमय्या हे धार्मिक विधीसाठी उपस्थित होते.पाच तासानंतर ११ वाजता होमास भोपळे, कव्हाळे, श्रीफळाची पूर्णाहुती देण्यात आली.मंदिरातील होमकुंडावर मंगळवारी ( दि. २० ऑक्टोंबर) दुपारी बारा वाजता अजाबलीचा धार्मिक विधी पार पडून घटोत्थापनाने शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.तहसील कार्यालयाचे शिपाई अजाबलीच्या धार्मिक विधीचे मानकरी आहेत. सिंदफळ येथील लांडगे कुटुंबियांकडून देवीच्या धार्मिकविधीसाठी बोकड देण्याची प्राचीन प्रथा व परंपरा आहे.श्री तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन व शिबिकारोहण बुधवारी (२१ ऑक्टोंबर २६) पहाटे पार पडणार आहे.

दरम्यान अहिल्यानगर व भिंगार येथून येणाऱ्या पलंग- पालखीचे मंगळवारी सायंकाळी शहरात आगमन होत असून पलंग-पालखीचे पूर्वज जानकोजी भगत (तेली) यांच्या समाधीस्थळापासून बुधवारी मध्यरात्री संबळाच्या कडकडाटात ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात ही पलंग व पालखी मंदिरात पहाटे पोहचल्यानंतर मातेची नव्या पालखीतून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण होवून सीमोल्लंघन सोहळा पार पडणार आहे.

यंदा दोन सातव्या माळा आल्याने नऊ ऐवजी दहा दिवसांचे नवरात्र साजरे झाले.परिणामी सर्वसामान्यांचा दसरा महानवमीदिवशी तर मातेचा दसरा बुधवारी साजरा होत आहे.श्री तुळजा भवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर मातेची मुख्य मूर्ती पाच दिवसासाठी नव्या पलंगावर श्रम निद्रा घेणार आहे.ही निद्रा २६ ऑक्टोंबरच्या पहाटे संपणार असून त्याच दिवशी मातेची मुख्य मूर्ती सिंहासनाधिष्ठीत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news