

The municipality has taken concrete steps to control the increasing unsanitary conditions and waste problem in the city
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढती अस्वच्छता व कचरा समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. स्वच्छ धाराशिव अभियानाची आखणी करण्यात आली आहे.
या अभियानांतर्गत शहरात प्रभागनिहाय स्वच्छता व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली असून, नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी सुपरवायजरांची नेमणूक करून त्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्यात आले आहेत. शहरात कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ परिसर, नाली तुंबणे, घंटागाडी न येणे आदी कोणत्याही स्वच्छतेसंबंधी तक्रारी असल्यास नागरिकांनी आपल्या प्रभागातील संबंधित सुपरवायझरशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी केले आहे.
काही प्रभागांमध्ये सुपरवायझर उपलब्ध नसल्यास, त्या प्रभागातील नागरिकांनी संबंधित झोनल अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. १०० दिवसांच्या संकल्पांतर्गत शहरात विविध विकासात्मक व स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचा एक भाग म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले आहे, असे श्री. ढोबळे यांनी सांगितले. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.