

The flood swept away the farm, the house fell
भूम, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मात्रेवाडी गावातील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय ४२) यांनी प्रचंड झालेल्या नुकसानीने व कर्जाच्या ओझ्याने हतबल होऊन लक्ष्मण पवार गोठ्यातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
लक्ष्मण पवार यांच्या अडीच ते तीन एकरपैकी बहुतांश शेती नदीकाठावर होती. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने त्यांच्या शेतातील माती खरडून गेली. शेतात आता मोठमोठे दगड व वाळू उरले असून पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. कांदा व सोयाबीन पिकाचा राखरांगोळी झाल्याने शेती कसण्यायोग्य राहिली नाही.
याशिवाय त्यांच्या नावावर दोन ट्रॅक्टरचे कर्ज होते. शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे कर्जफेडीची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता वाढली. गेल्या दोन दिवसांपासून तणावग्रस्त अवस्थेत घरापासूनही ते दूर राहिले. शेवटी त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
लक्ष्मण यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुले असा परिवार उरला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर को-सळला आहे. त्यातच आज सकाळी पुन्हा एकदा झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांच्या घराचा पुढील भिंतीचा भाग कोसळला. अवघ्या पाच दिवसांत कुटुंबाने कर्ता पुरुष व घर गमावले, त्यामुळे पवार कुटुंब उघड्यावर आले आहे.
या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करत आहेत. शेतकरी आत्महत्येची ही साखळी थांबवायची असेल तर शासनाने तातडीने मदत करावी, कर्जमाफीसह आधार द्यावा, अशी मागणी होत आहे.