उमरगा : राज्यातील गणेशोत्सव चार दिवसांवर आला असताना राज्यातील बससेवा विस्कळीत झाली आहे. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून (दि. ३) बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्यानुसार उमरगा आगारात कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून सकाळपासून एस.टी. वाहतूक ठप्प आहे. (ST workers protest)
उमरगा आगार हे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने येथील बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशी ये-जा करतात. मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे एस. टी. महामंडळातील संघटनांनी संयुक्त कृती समिती स्थापन केली. या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस. टी. महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धती मधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे, या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. (ST workers protest)
यात उमरगा आगारातील चालक, वाहक, प्रशासन व यांत्रिक विभागातील महिला पुरूष कर्मचारी सहभागी झाल्याने एकही बस जागची हलली नाही. त्यामुळे उमरगा आगारातील तालुका व लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यातून प्रवाशांचा प्रवास बसअभावी बंद झाला. ऐन गर्दीच्या हंगामात एक दिवसाचा महामंडळाला लाखों रुपयांचा फटका बसला आहे. धरणे आंदोलनात प्रशासन विभागातील लिपिक पूजा गायकवाड, वंदना चव्हाण, संतोष बिराजदार, गोविंद भोसले, बिराजदार, आदिसह कर्मचारी सहभागी झाले आहेत.