Dharashiv Sugarcane Fire | सौंदना आंबा येथे शॉर्टसर्किटने २५ एकर ऊस जळून खाक; १५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दुष्काळात कसाबसा जोपासलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; नुकसानभरपाई आणि दरकपात स्थगित करण्याची मागणी
Kalamb Sugarcane Fire
Kalamb Sugarcane FirePudhari
Published on: 
Updated on: 

Kalamb Sugarcane Fire

कळंब : तालुक्यातील सौंदना (आंबा) येथे सोमवारी (दि. २६) शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत १५ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, उदरनिर्वाहाचा आधार असलेले पीक जळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आग लागल्यानंतर परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडांच्या पाल्याच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही शेतांमध्ये ऊसाचे पाचट असल्याने आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीने सुमारे २५ एकरांतील ऊस भस्मसात केला.

Kalamb Sugarcane Fire
Dharashiv Drought News : अर्ध्या गुंठ्यात सव्वादोन किलो सोयाबीन !

आधीच दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यावर ऊस जगवावा लागला होता. अशा परिस्थितीत हाताशी आलेले पीक जळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. जळालेल्या उसातून अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच जळीत उसावर २५ टक्के दरकपात होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात किती रक्कम उरणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या घटनेत ऋषिकेश पालकर, माणिक पालकर, श्रीमंत पालकर, नवनाथ पालकर, अंबादास गिरी, दत्ता गिरी, बापू गिरी, प्रभावती पालकर, निलावती मोरे, आशाबाई डिगे, अनंत डिगे, मुरलीधर गाडेकर, दत्ता गाडेकर, तुकाराम गाडेकर आणि महादेव गाडेकर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Kalamb Sugarcane Fire
Dharashiv News : जोगव्याच्या परडीत फुले अन् क्यूआर कोडद्वारे पैसे !

नुकसानभरपाईची मागणी

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळण्याच्या घटनांचे पंचनामे होतात; मात्र परिसरातील बाधित शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, असा आरोप युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप पालकर यांनी केला. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी या प्रकरणात लक्ष घालून बाधित शेतकऱ्यांना विशेष निधीतून मदत द्यावी. तसेच दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन जळीत उसावरील २५ टक्के दरकपातीचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news