

Sant Muktai Palkhi welcomed in Bhum; Thousands in attendance
भूम, पुढारी वृत्तसेवा : सावळ्या विठ्ठलाचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी भूम नगरीत संत मुक्ताबाईंच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीचे शहरात आगमन होताच जोरदार आतषबाजी करत, ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी आणि भक्तिमय घोषणांनी वातावरण भारून गेले.
सकाळी पालखीचा वाशी रोडमार्गे शहरात प्रवेश झाला. गोलाई चौक, मुख्य रस्ता मार्गे पालखी चीडेश्वरी मंदिराकडे मार्गस्थ झाली. या मार्गावर भाविकांनी रांगोळ्या काढल्या, भजन-कीर्तन केले आणि फुलांची उधळण करत पालखीचे स्वागत केले. दर्शनासाठी शहरवासीयांसह परिसरातील हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.
यावेळी नागोबा तरुण गणेश मंडळाच्या वतीने नाश्त्याची व्यवस्था, तर कोष्टी समाज बांधवांकडून भोजनाची सेवा करण्यात आली. पालखीच्या मुक्कामासाठी रवींद्र हायस्कूलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. पालखी सोहळ्याचे नगरपालिका चौकात पोहोचल्यावर भूम नगरपरिषद आणि सर्वपक्षीयांच्या वतीने विशेष स्वागत करण्यात आले. याचवेळी शहरात संत बाळूमामांची पालखीही दाखल झाली होती.
विशेष म्हणजे बाळूमामांच्या मेंढ्यांनी मुक्ताई पालखीभोवती गोल रिंगण करत भक्तीरसात अधिक भर घातली. ३१८ वर्षांची परंपरा लाभलेल्या या पालखीचा भूम शहरात २४वा मुकाम होता. हा सोहळा ६०० किलोमीटरचे अंतर ३० दिवसात पार करत पंढरपूरला पोहोचतो.
पालखी सोहळा ६ जिल्ह्यांतून मार्गस्थ होतो - सरमकुंडी, भूम, शेंद्री, माढा, शेटफळ मार्गे पंढरपूरकडे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पालखी मार्ग रूंद करून 'संत मुक्ताई पालखी मार्ग' नाव देण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. तसेच, इतर दिंड्यांप्रमाणे पालखीतळ उभारणे, ग्रामपंचायतींना अनुदान देणे यासंबंधीही शासनाकडे ठाम मागणी करण्यात आली.