

Rainfall in Bhum for a month
भूम, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या तोंडावर प्रत्येक घरात आनंदाची तयारी सुरू असताना भूम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात मात्र चिंतेचे ढग दाटले आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने मोठी ओढ दिल्याने गेल्या महिनाभरापासून सोयाबीन, तूर, उडीद यासह खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत. ऐन शेंगा भरण्याच्या निर्णायक टप्प्यात पावसाने दडी मारल्याने यंदाच्या उत्पादनाच्या आशेवर पाणी फेरले आहे.
यंदा भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी झाली. सुरुवातीच्या काळात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे.
अनेक शेतांमध्ये भेगा पडल्या असून सोयाबीनची पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. काही ठिकाणी पीक जागेवरच करपण्यास सुरुवात झाली आहे. तूर आणि उडदाचीही पानगळ होत असून नसून झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत.
बियाणे, खते, कीटकनाशके, औषधफवारणी, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला. मात्र, आता पिकेच धोक्यात आल्याने केलेला खर्च तरी निघणार का, असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सोयाबीन हे भूमसह धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असल्याने उत्पादन घटल्यास कर्जफेडीसह घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि पुढील हंगामाचे नियोजन कोलमडण्याची भीती आहे.
नुकसानीनंतर केवळ पंचनामे, अहवाल आणि कागदोपत्री प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवू नये. प्रशासनाने प्रत्यक्ष शेतशिवारात पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी मागणी होत आहे.
सणासुदीला आनंदाऐवजी चिंता
सणासुदीच्या दिवसांत शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, अशी बळीराजाची अपेक्षा होती. मात्र, पावसाच्या दडीने या स्वप्नांवरच घाला घातला आहे. पाऊस दगा देत असताना शासनाने तरी शेतकऱ्याला दगा देऊ नये, अशी आर्त भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.