

भूम: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू असलेले हादरे आता धाराशिव जिल्ह्याच्या भूम-परंडा-वाशी मतदारसंघातही बसण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकेकाळचे निष्ठावंत शरद पवार समर्थक आणि मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे हे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, येत्या ५ किंवा ९ ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता असून, या वृत्ताने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राहुल मोटे यांनी सलग तीन वेळा परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतरही मोटे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला. गावागावांतील कार्यक्रम आणि नागरिकांच्या भेटीगाठींमुळे त्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले होते. आता त्यांच्या संभाव्य पक्षबदलामुळे त्यांना सत्तेत थेट सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रवेशावेळी मोटे यांना महामंडळ किंवा राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणता येईल, हा यामागे मुख्य हेतू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.
राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशामुळे केवळ परंडा मतदारसंघावरच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या संघटनात्मक बांधणीवर मोठा परिणाम होणार आहे. या पक्षबदलाने पराभवामुळे काहीशा मरगळलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात नवा उत्साह संचारू शकतो. मोटे यांच्यासारखा जनाधार असलेला नेता मिळाल्याने जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद निश्चितच वाढेल. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अजित पवार गट अधिक आक्रमकपणे उतरण्याची तयारी करू शकेल.
"घड्याळ तेच, पण वेळ नवी," या उक्तीप्रमाणेच परंड्याच्या राजकारणाची स्थिती झाली आहे. एकेकाळी शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राहुल मोटे आता ‘घड्याळ’ तेच ठेवून ‘वेळ’ बदलण्याच्या तयारीत आहेत. भूम शहरातील चौकाचौकांत याच चर्चेला उधाण आले आहे. आता त्यांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक राजकीय पुनर्वसनासाठी असेल की मतदारसंघाच्या विकासाला खरोखरच नवी दिशा देणारा ठरेल, याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.