

भूम : जनतेची कामे होत नसतील तर पाणीपुरवठा व बांधकाम सभापतींनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी पत्रकार परिषदेत केली. विरोधकांना जनतेच्या विकासाचे किंवा जनहिताचे काही देणेघेणे नसून ते खोटेनाटे बोलून निवडून आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
निवडून आल्यानंतरही त्यांचा तोच कारभार सुरू असून, मात्र मला जनतेने जनसेवेसाठी निवडून दिले आहे. विकासकामांना अडथळा आणणाऱ्यांना आम्ही विरोध करू, असे त्या म्हणाल्या. नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी गटनेते संजय गाढवे, सुरज गाढवे, नगरसेवक अभिजीत शेटे, माळी महासेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष बालाजी माळी, अख्तर जमादार, सुनील थोरात उपस्थित होते.
नगराध्यक्ष व माजी गटनेत्यांवर विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत गाढवे यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. जनशक्तीचे नगरसेवक जनसेवा करतो असे सांगतात, मग कामे बंद पाडणे हीच जनसेवा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सभागृहात कामांना विरोध करून बाहेर मात्र विकास होत नसल्याचा गवगवा केला जात असल्याची टीका त्यांनी केली.
विरोधकांकडून प्रशासन व कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत शहराची बदनामी केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील वीज, पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकारण केले जात आहे. त्यामुळे संबंधित सभापतींनी कामे सुधारावीत, अन्यथा राजीनामे द्यावेत, असा इशारा गाढवे यांनी दिला.