येरमाळा, पुढारी वृत्तसेवा: श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची ३ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. नवरात्र महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सर्व प्रकारच्या सोई सुविधा पुरवण्यासाठी मंदिर देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली असून देवीच्या मंदिराची रंगरंगोटी काम अंतिम टप्प्यात आहे.
३ ऑक्टोबर अश्विनशुद्ध प्रतिपदेस रात्री आठ वाजता देवीची पंचोपचार महापूजा, महाआरतीने घटस्थापनणेने श्री येडेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे. तुळजाभवानीची धाकटी बहीण महणून श्री येडेश्वरी देवीची राज्यभर प्रसिद्धी असल्याने तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भाविक येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतो.
नवसाला पावणारी देवी म्हणून जागृत श्री. येडेश्वरी देवस्थान महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे नवरात्र काळात लाखो भाविक देवी दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी मंदिर ट्रस्टकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे, यामध्ये येडेश्वरी मंदिराचा परिसर स्वच्छ करणे, मंदिरावर रंगरंगोटी, मंदिरातील चांदीचे आवरण असलेले खांब स्वच्छ करणे, मंदिरातील तांब्याच्या पितळाच्या मोठ्या वस्तू स्वच्छ करणे मंदिरावर, मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई अशी विविध कामे लगबगीने करण्यात येत भाविकांना आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून श्री येडेश्वरी देवीचा लौकिक आहे.
तुळजाभवानीचे दर्शन झाल्यानंतर तुळजापूरला येणारा भाविक आवर्जुन येरमाळाला दर्शनासाठी येतो. नवरात्र काळात राज्यातील लोक पंचक्रोशीतील लोक देवीच्या डोंगराला खेटा (प्रदक्षिणा) घालतात नवरात्र काळात, भाविक दर्शनासाठी गर्दी असते. गावातील पंचक्रोशीतील भाविक घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून देवीच्या डोंगराला खेटा (प्रदक्षिणा) घालण्याची पद्धत रूढ झाल्याने लोक पाच दिवस भल्या पहाटेपासून खेटा घालतात. मंदिराला पहाटे खेटा घालण्याची जनु भाविकात स्पर्धाच असल्याचे चित्र असते.
नवरात्र महोत्सव, चैत्र पौर्णिमा, नारळी पौर्णिमा हे उत्सब गर्दीचे असतात. देवीच्या डोंगराला दोरा वाहून कोणी साकडे घातले तर कोणी नवस पूर्ण झाला म्हणुन देवीच्या डोंगराला दोरा वाहन खेटा घालतात. श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येत आहे मंदिराच्या शिखरावर तसेच पायऱ्यावर, मंदिर परिसरामध्ये, मंदिर परिसराच्या गाभाऱ्यामध्ये रोषणाई केल्याने मंदिरा परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे.
नवरात्र काळामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थांकडून दर्शन रांगेची व्यवस्था, भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेटा (प्रदक्षिणा) मार्गावरील रस्त्याची स्वच्छता, खेटा मार्गावर प्रकाशासाठी पथदिवे व्यवस्था लावण्यात येत असल्याचे येडेश्वरी मंदिर संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब बेद्रे यांनी सांगितले.