

उमरगा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे उमरगा- लोहारा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, तालुक्यातील पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांना भावनिक पत्र लिहून पक्षाशी निष्ठावान राहण्याचे आवाहन केले आहे. गरज पडल्यास आमच्या किडण्या विकू व १०० कोटी जमा करु पण पक्ष सोडू नका असे भावनिक आवाहन केले आहे.
पत्रात शिवसैनिकांनी नमूद केले आहे की, गेल्या चार दशकांपासून त्यांनी कोणत्याही पदाची किंवा लाभाची अपेक्षा न ठेवता शिवसेनेसाठी कार्य केले आहे. अनेक संकटांच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जोडल्या गेल्या असल्याचे पत्रात म्हटले आहे.
सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या "ऑपरेशन टायगर" संदर्भातील चर्चांचा उल्लेख करत, खासदारांनी पक्षांतर केल्यास सहा लाख मतदारांचा तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा विश्वासघात होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. तसेच निधीअभावी विकासकामे रखडली तरी जनतेची नाराजी आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाही, अशी ग्वाहीही कार्यकर्त्यांनी दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची जाणीव करून देत, त्यांना त्रास होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
शिवसैनिकांनी शेवटी पक्षाच्या विचारांशी आणि ठाकरे कुटुंबाशी कायम निष्ठावान राहण्याचे आवाहन करत आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. पत्रावर उबाठा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुधाकर पाटील, बसवराज वरनाळे, रणधीर पवार, रज्जाक अत्तार, विजयकुमार नागने, विजयकुमार तळभोगे, सिद्धाराम हात्तरगे, अशोक सांगवे , संतोष जाधव आदीसह शिवसैनिकांच्या सह्या आहेत.
गरज पडल्यास किडण्या विकू!
काही माध्यमांमध्ये पक्षांतरासाठी आर्थिक प्रलोभन दिल्याच्या चर्चांचा संदर्भ देत शिवसैनिकांनी अत्यंत भावनिक भाषेत, "गरज पडल्यास आम्ही आमच्या किडन्या विकून १०० कोटी रुपये जमा करू, मात्र आपण पक्ष सोडू नका," असे पत्राद्वारे आवाहन केले आहे.