

Naldurg Student Kidnapped
नळदुर्ग : येथील ‘आपलं घर’ बालगृहातून कोल्हापूर जिल्ह्यातील १४ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बालगृहाच्या अधीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात (जि. धाराशिव) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज हरी काळे (वय १४, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ बालगृहात राहत होता. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याला बालगृहातून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बालगृहाचे बाल अधीक्षक संदीप राजेंद्र चवले (रा. जेवळी, ता. लोहारा) यांनी १८ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.