

तुळजापूर : तुळजाभवानी देवीची नित्य पूजा आणि भाविकांचा कुलधर्म कुलाचार मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना बंद केला जाणार नाही, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी रविवारी (दि.९) पत्रकार परिषद घेऊन दिली. कोणीही स्थानिक पातळीवर विकास कामात राजकारण करू नये, असेही ते यावेळी म्हणाले.
तुळजापूर येथील शासकीय सर्किट हाऊस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये युवक नेते विनोद गंगणे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद कंदले, भाजपचे नेते नागेश नाईक, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, भाजपा नेते शिवाजी बोधले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शिंगाडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार राणा जगजीत सिंह पाटील म्हणाले, आपण कोणत्याही गैरसमज आणि अफवा यांच्यावर विश्वास ठेवू नका. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू राहिले तरी तुळजाभवानी देवीची नित्य पूजा आणि कुलधर्म कुलाचार सुरळीतपणे सुरू राहील. यामध्ये कोणालाही अडवले जाणार नाही. तसेच शंकराचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन तसेच छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या सूचनांचे योग्य निर्देश घेऊन सर्व विकासकामांना गती दिली जाईल. तुळजापूर मंदिरात होणारी दिवसेंदिवस होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे पालन आगामी काळात करावे लागणार आहे. विकास कामाला अडचण येणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार सर्वच तीर्थक्षेत्रांचा विकास करत असल्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास निश्चित होणार आहे. यामधून तुळजापूरचे अर्थकारण खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असेही आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.