

धाराशिव : जिल्ह्याच्या जलसुरक्षेसाठी महत्त्वाच्या कृष्णा-मराठवाडा (सिंचन) प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्र सरकारमार्फत आवश्यक आर्थिक सहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
मराठवाडा हा वारंवार दुष्काळाचा सामना करणारा प्रदेश असून, आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या धाराशिवसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट आहे. त्याचा कृषी, उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. कृष्णा-मराठवाडा प्रकल्प पूर्ण झाल्यास लाखो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल.
भूजल पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होण्यासह कृषी उत्पादन, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असे निंबाळकर यांनी नमूद केले. प्रकल्पासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय खर्च अपेक्षित आहे. मात्र, राज्य सरकारकडून दरवर्षी केवळ ४०० ते ५०० कोटी रुपयांची तरतूद होत असल्याने कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राने या प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नियमित पाठपुरावा सुरू ठेवून शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.