

कळंब : तालुक्यात रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा आणि वाशिरा नद्यांना प्रचंड पूर आला असून, खोंदला येथील सुब्राव लांडगे नावाचे शेतकरी मांजरा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. या प्रलयंकारी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सुब्राव लांडगे हे शेतातून घरी परतत असताना पुलावरून पाय घसरल्याने नदीच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक युद्धपातळीवर कार्यरत आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आढाळा गावातही काही जनावरे आणि शेळ्या दगावल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
तालुक्यात रात्री उशिरा पावसाचा जोर वाढला आणि सरासरी १६० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी संजय पाटील, तहसीलदार हेमंत ढोकले हे घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
एकीकडे हे संकट असताना, दुसरीकडे लातूर, अंबाजोगाईसह अनेक शहरांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणाची पाणीपातळी ३० टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांवर पोहोचली आहे. पाण्याची आवक पाहता धरण लवकरच ७० टक्के भरेल, असा अंदाज शाखाधिकारी अनुप गिरी यांनी व्यक्त केला आहे.