

वाशी: तालुक्यातील पारगाव जनकापूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्याने येथील वाहतूक महिनाभरापासून ठप्प झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना पायपीट करत सुरक्षित मार्गाने पारगावला पोहोचावे लागत आहे. वर्षभरापूर्वी हा रस्ता बांधला गेला होता, परंतु पुलाची स्थिती बिकट आहे.
या रस्त्याच्या व पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यासाठी ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी प्रशासनाला जलसमाधी आंदोलनाचे निवेदन दिले होते. प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून खचलेल्या पुलावर मुरूम टाकून रस्ता सुरू केला, मात्र स्थानिकांना यावर समाधान मिळाले नाही.
यामुळे ग्रामस्थांनी शनिवार दि. २० रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मांजरा नदी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. दिवसभर पाण्यात उभे राहूनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने तणाव निर्माण झाला.
स्थानिक तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, नायब तहसीलदार रामकिशन साबळे, बांधकाम विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी सचिन पवार, ग्राम महसूल अधिकारी किशोर उंदरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू लाटे याठिकाणी उपस्थित होते. ते आंदोलकांना बाहेर येण्याचे आवाहन करत होते, परंतु ग्रामस्थांनी आपली भूमिका ठाम ठेवली.
वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. आ. तानाजी सावंत व माजी आ. राहुल मोटे यांनी फोनवरून डी.पी.डी.सी.मध्ये निधी उपलब्ध करून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले, परंतु आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासनाशिवाय माघार न घेण्याची भूमिका ठाम ठेवली.
सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून त्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांना कळवल्या असल्याचे सांगितले. त्यांनी आश्वासन दिले की येत्या बुधवारी जिल्हाधिकारी व गावकऱ्यांची भेट घेऊन काम मार्गी लावले जाईल. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले.