

Illegal transportation of cattle continues, three cases registered
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी निर्दयीपणे आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. वाशी, परंडा आणि भूम पोलिसांनी ही कारवाई केली. ताब्यात घेऊन मुक्त केलेल्या पशुधनाची किंमत साधारण १७ लाख रुपये आहे.
वाशी : ८ जुलै रोजी वाशी पोलिसांनी इंदापूर शिवारातील भैरवनाथ साखर कारखान्यासमोर हायवे रोडवर एका पिकअप (एमएच १३ डीक्यू ०७०६) मध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करताना आरोपी किरण तायाप्पा शिंदे (वय ३८, रा. परंडा) याला पकडले.
या पिकअपमध्ये ३ जर्सी गायी, १ खिल्लार गाय आणि १ गीर गाय असे एकूण ३,५०,००० रुपये किमतीच गोवंशीय जनावरे वाहनासह मिळून आली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंडा ८ जुलै रोजी परंडा पोलिसांनी वारदवाडी ते भूम रस्त्यावर सीमा दाजीबा गुंजाळ यांच्या शेताजवळ एका पिकअप (एमएच ११ बीएल ४४०९) मध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करताना पकडले.
या वाहनात ४ जर्सी गायी आणि २२ वासरे असे एकूण २,१०,००० रुपये किमतीचे गोवंशीय जनावरे वाहनासह ५,१०,००० रुपये किमतीची मिळून आली. याप्रकरणी परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भूम : ८ जुलै रोजी भूम पोलिसांनी शासकीय दूध डेअरी, भूम येथे एका आयशर टेम्पो (एमएच १३ एएक्स ३१३२) मध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करताना पकडले. या टेम्पोमध्ये १२ जर्सी गायी आणि ४ वासरे असे एकूण १,८४,००० रुपये किमतीचे गोवंशीय जनावरे वाहनासह ८,८४,००० रुपये किमतीची मिळून आली. भूम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.