

रत्नापूर : बाळासाहेब जाधवर राज्यासह पर राज्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरात पुन्हा एकदा ‘टायगर गेम’ या बेकायदेशीर जुगाराने डोके वर काढले आहे. मंदिर परिसरातच उघडपणे जुगाराचे अड्डे सुरू असल्यामुळे देवस्थानच्या पवित्रतेला धक्का बसत असून, भाविक आणि ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी याच ठिकाणी जुगाराच्या कारणावरून पुण्यातील काही महिला भाविक आणि जुगाऱ्यांमध्ये वाद व झटापट झाली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर जुगार बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित यंत्रणांनी ठोस कारवाई न केल्याने हा प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पौर्णिमा यात्रेनंतर मंदिर परिसरात पुन्हा जुगाराचे टेबल सुरू झाले आहेत.
पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह
ग्रामस्थांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. जुगार सुरू असल्याचे फोटो व माहिती देऊनही पोलिस वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप केला जात आहे. काही वेळा पोलिस येईपर्यंत जुगाराचे अड्डे हटवले जातात आणि “काहीच आढळले नाही” असे सांगितले जाते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात संशय व्यक्त केला जात आहे.
इन्स्टाग्राम रीलमुळे प्रकार उघड
मंगळवारी एका भाविकाने बनवलेल्या इन्स्टाग्राम रीलमुळे हा प्रकार पुन्हा समोर आला. या व्हिडिओमध्ये मंदिर परिसरात ‘टायगर गेम’ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून, ग्रामस्थांनी तो पुरावा म्हणून पुढे केला आहे.
भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
मंदिर परिसरात सुरू असलेल्या या जुगारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही नागरिकांच्या मते, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जबरदस्तीने खेळायला लावले जाते. विशेषतः महिला भाविकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
भाविकांची मागणी
येरमाळा येथील ज्येष्ठ समाजसेवक मनोज भाऊ बारकुल यांनी सांगितले की, “येडेश्वरी मंदिर परिसरात बऱ्याच दिवसांपासून टायगर गेम सुरू आहे. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा जुगार बंद झाल्याशिवाय समस्या सुटणार नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी.”
बीड येथील भाविक व गुरव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू गुरव यांनीही सांगितले की, “भाविकांना जबरदस्तीने ‘टायगर गेम’ खेळायला भाग पाडले जाते. हा प्रकार त्वरित थांबवणे गरजेचे आहे.” या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मंदिर परिसरातील जुगार पूर्णपणे बंद करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.