

Heavy rains in Vashi taluka; relief for soybeans
वाशी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सरीसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. २१ जुलैपासून सुरू झालेल्या या पावसाने शुक्रवार (दि. २५) आणि शनिवारी पहाटेपासून संततधार सुरू ठेवली. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यामुळे तालुक्यातील नद्यांना पूर येऊन शेतीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात खरीप हंगामासाठी ४५ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ३९ हजार ५५९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वाधिक ३८ हजार १३४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, पेरणीनंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतल्याने पिके सुकू लागली होती.
या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दसमेगाव नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या कामालाही या पावसाचा फटका बसला आहे. पूराच्या पाण्यात साईड रोड वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून कळंबकडे जाणारी वाहने पिंपळगाव (लि.) आणि इंदापूर मार्गे वळवण्यात आली आहेत. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. तालुक्यातील अनेक लहान-मोठ्या नद्यांना पुराचे स्वरूप आले असून, शेतीसाठी आवश्यक अशी ओलावा तयार झाली आहे.
त्यामुळे पेरणी झालेली सोयाबीन व इतर खरीप पिके जोमाने वाढू लागली आहेत. या संततधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. पावसामुळे तयार झालेल्या पोषक हवामानामुळे तालुक्याच्या शिवारात पुन्हा एकदा चैतन्य पसरले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.