तुळजापूर: पुढारी वृत्तसेवा: तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या (Navratri 2024) पाचव्या दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. देवीसमोर रथालंकार महापूजा मांडण्यात आली होती. मंदिर परिसरामध्ये जास्त गर्दी झाल्यामुळे भाविकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अस्वच्छता याचा भाविकांना फटका बसला.
शारदीय नवरात्रौत्सवाच्या (Navratri 2024) पाचव्या दिवशी पहाटेपासून भाविकांची गर्दी सुरू राहिली दिवसभर ही गर्दी कमी झाली नाही. सायंकाळपर्यंत सर्व रस्ते भाविकांनी भरलेले होते. बस स्थानक मार्ग, भवानी रोड, महाद्वार चौक, मेन रोड आणि धाराशिव रोड महामार्ग येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. सर्व मार्गावरील वाहन तळ वाहनांनी भरून गेले होते. तेथून भाविक ऑटो रिक्षा आणि चालत घाटशीळ प्रवेशद्वाराकडे जात होते. अभिषेक रांगा सकाळी १० वाजेपर्यंत चालू राहिल्या १० वाजता अभिषेक पूर्ण झाले.
रविवारी अश्व वाहनावर तुळजाभवानी देवीचा रात्रीचा छबिना झाला. तहसीलदार अरविंद कोळंगे, मंदिरच्या तहसीलदार माया माने, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तुळजाभवानी पुजारी मंडळाध्यक्ष विपिन शिंदे, मध्य मडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो पाळीची पुजारी कदम यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी बारा वाजता आरती झाल्यानंतर भोपे पुजारी सचिन अमृतराव, अतुल मलबा, शशिकांत परमेश्वर यांच्यासह इतर पुजारी बांधवांनी तुळजाभवानी देवीच्या चांदीच्या सिंहासनावर रथ अलंकार पूजा मांडली. पर्ण, पाचू ,हिरे, माणिक, मोती यांनी जडवलेले देवीचे प्राचीन अलंकार डबा क्रमांक एक देवीला घालण्यात आले. तुळजाभवानी देवीच्या हातामध्ये चाबूक असून देवी रथावर बसून रथाचे सारथ्य करीत आहे. असा हा विहंगम देखावा भाविकांना पाहावयास मिळाला. गाभाऱ्यामध्ये सिंहासनाच्या समोर सात चांदीचे अश्व असून देवीचे चांदीचे सिंहासन हा रथ आहे आणि ती रथामध्ये बसलेली आहे. देवीला अबोली रंगाचा शालू नेसविण्यात आला होता. देवीचे केस मोकळे सोडलेले होते आणि हातामध्ये रथाचे दोर तिने हातामध्ये घेतलेले आहेत, असा हा देखावा होता.