

धाराशिव : पंचायत समितीमधून समता नगरकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता तत्काळ खुला करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेनेनेने (युबीटी) आज आक्रमक होत जिल्हा परिषदेने दुसऱ्यांदा बंद केलेला रस्ता आज आंदोलन करीत खुला केला. येथे लावलेल्या तारांचे कुंपण कापून शिवसेनेने प्रशासनाला हिसका दाखवला.
शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी सांगितले, की धाराशिव नगर परिषद हद्दीतील सर्व्हे क्रमांक 145 मधून जिल्हाधिकारी कार्यालय ते समता कॉलनीला जोडणारा सुमारे 12 मीटर रुंदीचा हा डी.पी. रस्ता असून तो पंचायत समितीच्या क्वार्टरसमोरून जातो. गेल्या 50 वर्षांपासून या रस्त्यावरून नागरिकांची नियमित ये-जा सुरू आहे. या मार्गाचा वापर करून नागरिक दवाखाने, शासकीय कार्यालये, बँका आदी ठिकाणी सहज पोहोचत होते.
मात्र, पंचायत समितीने समता कॉलनीच्या बाजूने सिमेंटचे पोल उभे करून हा रस्ता बंद केल्याचा आरोप नागरिकांकडून झाल्यानंतर मार्च महिन्यात आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. त्यानंतर हा रस्ता शिवसेनेने खुला केला होता. तरीही चार दिवसांपूर्वी हा रस्ता पुन्हा तारांचे कुंपण घालून बंद करण्यात आला होता.
अखेर शुक्रवारी (दि. 24) हा रस्ता सकाळी 11 च्या दरम्यान गुरव यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हे कूंपण कापून काढले. या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नगरसेवक नाना घाडगे, पंकज पाटील,अमित उंबरे, उपशहरप्रमुख बंडू आदरकर,मनोज उंबरे, सागर मोरे आदी उपस्थित होते.
तर भिंतही पाडू : गुरव
समतानगर, जिल्हा महिला रुग्णालय, आरपी कॉलेज, भोसले हायस्कूल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, न्यायालय या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा रस्ता सोयीचा आहे. त्यातही नगरपालिकेचा तो डीपी रोड आहे. असे असतानाही जिल्हा परिषद हा रस्ता अडवत आहे. यापुढे येथे भिंत बांधली तरी शिवसेनेच्या वतीने ती पाडून टाकू. नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही, असा इशारा शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी या वेळी दिली.