उमरगा: धाराशिवच्या (Dharashiv Rain) उमरगा व ग्रामीण भागाला आज (दि १२) दुपारी दीडच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपून काढले. पाऊस सुरू असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून एका वासरासह पाच जनावरे ठार झाली आहे.
शहर व तालुक्यात सकाळ पासूनच अधून मधून ढगाळ वातावरण व मोठ्या प्रमाणात उष्णता होती. तालुक्यातील मुरूम, येणेगूर, नाईचाकूर, तुगाव, बेडगा, नागराळ, मुळज, त्रिकोळीसह बहुतांश ठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार अवकळी पाऊस झाला. यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. पावसामुळे भाजीपाला, आंबा, केळी, पपई, टरबूज आदी फळबागांची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी जमा करून ठेवलेला चारा व कडब्याच्या गंजी पावसात भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. Dharashiv Rain
दरम्यान अवकाळी पावसामुळे येणेगूर गावालगतच्या ओढयाला चांगलेच पाणी आले होते. शहरात रविवारी आठवडी बाजार असल्याने बाजारात भाजीपाला, फळे तसेच विविध वस्तू व साहित्य विक्रीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी छोटे छोटे स्टॉल लावले होते. दुपारी दीडच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे आठवडे बाजारात एकच तारांबळ उडाली. गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यालगत विक्रीसाठी ठेवलेला भाजीपाला, फळे व इतर साहित्य पाण्यात भिजून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरूच होत्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची उकाड्या पासून काहीशी सुटका झाली.
तालुक्यात धडकी भरविणाऱ्या विजांचे तांडव पाहायला मिळाले, वेगवेगळ्या चार ठिकाणी वीज पडून वासरासह दोन गाई, एक म्हैस व बैल असे मिळून पाच जनावरे दगावली. यात तुगाव येथील बाबुराव जामगे यांची गाय, नाईचाकूर येथे महेबुब मुल्ला यांची गाय आणि वासरू, बेडगा येथे दयानंद गावडे यांची म्हैस, तर नागराळ येथील व्यंकट निकम यांच्या एका बैलाचा समावेश आहे.
उमरगा नगरपालिका स्वच्छतेवर महिना काठी लाखो रुपये खर्च करत आहे. शहरातील स्वच्छता पावसामुळे चव्हाट्यावर आली. लाखोंचा निधी खर्च होतोच कुठे असा सवाल नागरिक करत आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून एक महिना शिल्लक असताना अवकाळी पावसामुळे पालिकेच्या स्वच्छता विभागाचे पितळ उघडं पडलं आहे. गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा