Dharashiv Drowning Incident : निलेगावात पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
Dharashiv Drowning Incident
Dharashiv Drowning Incident
Published on: 
Updated on: 

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील निलेगाव शिवारात जनावरांना पाणी पाजण्यासाठी पाझर तलावावर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १०) सकाळी घडली. अजय संतोष राठोड (वय १२) आणि रोहन संतोष राठोड (वय ११) अशी मृत मुलांची नावे आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन चिमुकल्या भावांचा दुर्दैवी अंत झाल्याने निलेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि रोहन हे दोघे भाऊ जनावरांना पाणी पाजण्यासाठी निलेगाव शिवारातील पाझर तलावावर गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही दोघे घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचे वडील संतोष राठोड यांनी तलावाच्या दिशेने जाऊन मुलांचा शोध घेतला. त्यावेळी तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने त्यांना अनर्थाची शंका आली.

यानंतर तलावात शोधमोहीम राबविण्यात आली. दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अजय हा सहावीत, तर रोहन हा पाचवीत शिकत होता. एकाच कुटुंबातील दोन मुलांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. दोन्ही मुलांच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण निलेगाव शोकसागरात बुडाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news