Dharashiv News | अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाजाचा मोर्चा!

मातंग समाजाने काढलेला मोर्चा
मातंग समाजाने काढलेला मोर्चा
Published on
Updated on

उमरगा : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती (एससी) आरक्षणांतर्गत उपवर्गीकरण करण्यास दिलेल्या मान्यतेची राज्यात तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत सकल मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि २४) तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आले.

शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालया पर्यंत अनुसूचित जाती (एससी) ५९ जाती (अ ब क ड) आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ दिलेल्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचताच त्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभेत रूपांतर झाले.

यावेळी माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, आझाद क्रांती सेना अध्यक्ष राजेश घोडे, लक्ष्मण क्षीरसागर, अँड सुखदेव होळीकर, नागीण कांबळे, शिवाजी गायकवाड, दिलीप गायकवाड, संजय सरवदे आदी उपस्थित होते. मोर्चाला संबोधित करताना माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षण उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिले आहे.

हा लढा कोणत्याही जातीच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून, वंचित मातंग समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून त्यांचा रास्त हक्क मिळवून देण्यासाठी असल्याचे सांगितले. तर माजी आमदार भालेराव म्हणाले, आरक्षण लागू झाल्यापासून अनुसूचित जातीमधील इतर घटकांचा विकास झाला नाही. इतर घटक शैक्षणिक दृष्ट्या वंचित राहिले आहेत. नौकरीमध्ये बरोबरीचा वाटा मिळाला नाही, यासाठी उपवर्गीकरण हवे आहे.

मातंग समाजाची अवस्था खूपच दयनीय असून शैक्षणिक दृष्ट्या मागास राहिल्याने जगणे असह्य होतं आहे. त्यामुळे जगण्यासाठी खातोय की खाण्यासाठी जगतोय हेच समजत नाही. सामाजिक व शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी आरक्षणाचे वर्गीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती (एससी) आरक्षणांतर्गत उपवर्गीकरण करण्यास दिलेल्या मान्यतेची राज्यात तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चात विजय तोडकर, तुळशीराम देडे, मारुती गायकवाड, सर्जेराव बनसोडे, छाया नायकवडी, अजय सरवदे, सिताराम कांबळे, अँड भागवत सगर, मनोज कांबळे आदी सह संविधान प्रेमी नागरिक, युवक-युवती, महिला व सकल मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news