

उमरगा : उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियेनंतर एका ३५ वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी अखेर दीड महिन्यानंतर धक्कादायक वळण आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशी अहवालात उपचारातील गंभीर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, भूलतज्ज्ञ, नर्स व संबंधित कर्मचाऱ्या विरोधात उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा शहरातील महात्मा फुले नगर येथील मैना रविराज सलके (वय ३५) यांना हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ मे रोजी सकाळी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर तासनतास उलटूनही त्या शुद्धीवर न आल्याने कुटुंबीयांनी वारंवार आरोग्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. प्रत्येक वेळी "थोड्याच वेळात शुद्धीवर येतील," असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. अखेर संबंधित डॉक्टरांनी तपासणी करून मैना यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी उपचारातील निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडले होते. डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी अहवालानंतर कारवाईचे आश्वासन दिले होते. अखेर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गंभीर हलगर्जीपणाची नोंद झाल्यानंतर संबंधितां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सरकारी विशेषतः उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
चौकशीत हलगर्जीपणा सिद्ध; तरीही तक्रारदार गप्प?
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशीत शस्त्रक्रिया करणारे डॉ. प्रभाकर केरबा बिचकाटे, भूलतज्ज्ञ डॉ. बसवराज सिद्रामप्पा दानाई व इतर कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाची गंभीर नोंद झाल्यानंतर पोलिसांनी मृत महिलेचे पती यांना तक्रार दाखल करण्यासाठी वारंवार संपर्क साधल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांच्याकडून तक्रार न दाखल झाल्याने कोणाचा दबाव होता, की अन्य कारण होते, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. अखेर सोमवारी, (दि १३) सरकार तर्फे फिर्याद दाखल करत डॉ. बिचकाटे, डॉ. दानाई व इतर कर्मचाऱ्यां विरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी करीत आहेत.