

धाराशिव : धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. यानुसार शहरात ९४ हजार १४ मतदार असून ते हक्क बजावतील, असे सांगण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि सहायक निवडणूक अधिकारी नीता अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचे वेळापत्रक व तपशील स्पष्ट केले. शहरात एकूण २० प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून दोन सदस्यांची निवड होणार आहे. मात्र प्रभाग क्र. १९ मधून तीन सदस्यांची निवड केली जाणार असून एकूण ४१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे.
धाराशिव शहरातील एकूण मतदारसंख्या ९४ हजार १४ असून त्यात ४८ हजार ४१३ पुरुष आणि ४५ हजार ५८५ महिला मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (दि.10) सुरुवात होणार असून सार्वजनिक सुट्या व रविवार वगळता दररोज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पार पडणार आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी १५ लाख रुपये, तर नगरसेवकपदासाठी ५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून संवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलिस अधीक्षकांना पत्र देण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.