Dharashiv Mahayuti politics : आ. राणाजगजितसिंहांविरोधात सुरू झाली खा. ओमराजेंची लढाई...!

सत्ताधारी महायुतीतच आता श्रेयवादाची नवी लढाई सुरू झाली आहे. त्यात खा. ओमराजेंना भाजपच्या जुन्या, नाराज निष्ठावंतांचे ‘बळ’ मिळाले आहे.
Dharashiv Mahayuti politics
Dharashiv Mahayuti politicspudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : भीमाशंकर वाघमारे

सत्ताधारी पक्षात गेलेल्या आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा सुसाट सुटलेला वारू त्यांचे कट्टर राजकीय विरोधक खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकरांसाठी तसेच पक्षांतर्गत विरोधकांसाठीही रुचणारा नव्हता. अखेर गेल्या महिन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला बायबाय करीत सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात दाखल झालेल्या खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकरांनी आ. राणाजगजितसिंहांविरोधात पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतच आता श्रेयवादाची नवी लढाई सुरू झाली आहे. त्यात खा. ओमराजेंना भाजपच्या जुन्या, नाराज निष्ठावंतांचे ‘बळ’ मिळाले आहे.

बहुचर्चित धाराशिव-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाचा पाठपुरावा खा. ओमराजेंनी पहिल्या टर्ममध्ये केला. ते सातत्याने, म्हणजे दरमहा रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेत होते. एकप्रकारे रेल्वे मंत्रालयावर सातत्याने दबाव राहील, याची काळजी त्यांनी घेतली. त्या वेळी राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे ओमराजेंच्या बैठकांना सरकारी पातळीवरूनही प्रतिसाद मिळत होता.

Dharashiv Mahayuti politics
Hingoli News : हिंगोलीत उद्धव सेनेला संघटन बांधणीचा विसर !

पुढे हे सरकार गडगडल्यानंतर खा. ओमराजेंच्या अशा बैठकांना निष्प्रभ ठरविणारी व्यवस्था लागली. राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता होती. त्याचा पुरेपूर फायदा भाजपचे आ. राणाजगजितसिंह यांनी उचलला. सत्ताधारी पक्षाचा आमदार या नात्याने त्यांनी सातत्याने केंद्र तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या मार्गाला गती दिली. पहिल्या टप्प्यात धाराशिव ते तुळजापूर हे कामही सुरू झाले.सुरुवातीला आ. पाटील केवळ स्टंट करीत असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. प्रत्यक्षात मागील दोन वर्षांत या कामाने गती घेतली. त्यामुळे विरोधकही हतबल झाले.

धाराशिव-तुळजापूर कामाला गती मिळाली असून, येत्या दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण होईल, असे नियोजन असल्याचे आ. पाटील यांनी जाहीर केले होते. आता त्यांनी तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाची निविदा प्रक्रिया लवकर करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी संबंधितांच्या भेटीही घेतल्या आहेत.मात्र, आता या श्रेयाच्या लढाईत अधिकृतपणे खा. ओमराजेही उतरले आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत रेल्वेशी संबंधित भल्या मोठ्या मागण्यांची यादी सादर केली. त्यात धाराशिव-सोलापूर रेल्वेमार्गाचाही मुद्दा होता. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानही त्यांनी या मागणीचा उल्लेख केला.

त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकही तत्काळ माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आले. हे दोन्ही नेते एकमेकांचे पारंपरिक राजकीय वैरी आहेत. आ. पाटील भाजपमध्ये, तर खा. राजेनिंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. विरोधी पक्षात राहून आलेली राजकीय बंधने आता पक्षांतरामुळे आपोआप गळून पडली आहेत. त्यातूनच या श्रेयवादाच्या पताका रोज दोन्ही बाजूंकडून फडफडू लागल्या आहेत.

Dharashiv Mahayuti politics
Devendra Fadnavis Jalna visit : मुख्यमंत्र्यांच्या जालना भेटीत उद्‌घाटनांची रेलचेल

त्यामुळे जनतेचे राजकीय मनोरंजन होत असले, तरी या श्रेयाच्या लढाईतून रेल्वेमार्गाचे काम मात्र गतीने पूर्ण व्हावे आणि तुळजापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न लवकर साकारावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

महायुतीतच ‘श्रेया’ची स्पर्धा!

एकेकाळी एकमेकांविरोधात उभे ठाकलेले हे दोन्ही नेते आता सत्ताधारी गोटात आहेत. मात्र, रेल्वेमार्गाच्या पाठपुराव्याचे श्रेय नेमके कुणाचे, यावरून राजकीय चुरस वाढताना दिसत आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्तेच्या माध्यमातून कामाला गती दिल्याचा दावा केला, तर खा. ओमराजे राजेनिंबाळकर यांनी आपण पहिल्या टर्मपासूनच या प्रश्नाचा पाठपुरावा केल्याचे दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे या राजकीय श्रेयवादात भाजपमधील काही नाराज चेहरे ओमराजेंच्या बाजूने उभे राहत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वेच्या कामाइतकीच या दोन्ही नेत्यांची राजकीय ‘पाठपुरावा एक्स्प्रेस’ कुठे पोहोचते, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news