

Dharashiv police action on gambling
उमरगा : उमरगा शहरातील एका नविन घरात तिर्रट नावाचा जुगार खेळताना पालिकेच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह अकरा जणांना शुक्रवारी, (दि ०९) दुपारी साडेतीन वाजता पोलीसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी ०२ लाख ८३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील बसवेश्वर विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या लोणी प्लॉट मध्ये विठ्ठल वामन चौगुले हा नवीन घरी तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे व पोलीस कर्मच्या-यांसह घरावर छापा टाकला असता घरात विठ्ठल वामन चौगुले, महादेव काशीनाथ सलके, संदिप दत्तात्रय गायकवाड व मदार शेख ( सर्व रा उमरगा), अरुण गोरोबा बिराजदार (रा यळवट,) गोविंद मारूती सगर (रा सुंदरवाडी), वामन लक्ष्मण गायकवाड (रा डिग्गी), अजित रतन चव्हाण (रा कदेर), ज्ञानेश्वर माणिकराव पाटील (रा तुरोरी), ईस्माइल युनूस पटेल (रा लामजना) व संतोष बापू नारंगवाडे हे सर्व ग्रुप करुन स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून गोलाकारात बसुन तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कमेसह २ लाख ८३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी उमरगा पोलिसांत ११ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान अनेक महिन्यांपासून राजरोसपणे घरी सुरू असलेल्या जुगार अड्ड्याला कोणाचं अभय होते. असा प्रश्न उपस्थित करून गुन्हे प्रकटीकरण शाखा नावालाच उरली असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.