

उमरगा : आजारपण व बायपास शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून उसनवारीच्या नावाखाली शहीद जवानाच्या पत्नीची तब्बल १० लाख ६६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उमरगा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोजर मारुती बनसोडे (रा. बँक कॉलनी, शास्त्रीनगर, उमरगा) या शहीद जवानाच्या पत्नी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बलसूर आश्रम शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका खुर्शीदा शेख यांनी ७ मे २०१९ ते १२ जून २०२० या कालावधीत बायपास शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ७ लाख ९१ हजार ५०० रुपये उसने घेतले. तसेच त्यांच्या परिचयातील सुलोचना तानाजी फडताळे यांच्याकडूनही २ लाख ७५ हजार रुपये घेतले.
वारंवार मागणी करूनही पैसे परत न केल्याने १६ डिसेंबर २०२० रोजी नोटरीद्वारे करार करण्यात आला. त्यानंतर खुर्शीदा शेख यांनी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी ७ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेश बँकेत सादर केल्यानंतर वटला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पैसे मिळवण्यासाठी सात वर्षे पाठपुरावा करूनही रक्कम परत न मिळाल्याने अखेर शहिद जवानांच्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेत या प्रकरणी सेवानिवृत्त शिक्षिके विरोधात उमरगा पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.