

वाशी/रत्नापूर : वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील बाबा फायर वर्क्स या फटाका कारखान्यात आज (दि.२९) दुपारी भीषण स्फोट होऊन आठजण जखमी झाले. जखमींमध्ये पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. यातील पाच जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी शेतकऱ्यांनी शेतातील बांध पेटवला होता. त्यातून उडालेल्या ठिणग्या बाबा फायर वर्क्स कारखान्यात पडल्याने हा भीषण स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात फटाके बनवून वाळवण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि परिसरात एकच धावपळ उडाली.
तेरखेडा शिवारातील शेती गट नंबर १२८१ मध्ये छोटोमीया दारुवाले यांच्या मालकीचा बाबा फायर वर्क्स हा फटाके बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात फटाके बनवून वाळवण्यासाठी उन्हात ठेवले होते . दुपारी तीनच्या सुमारास शेतीचा बांध पेटवल्यामुळे ठिणगी फटाक्यावर पडूली. यामुळे आग लागून कारखान्यात स्फोट झाला . या स्फोटात खोलीचे पत्रे उडून गेले व कारखान्यात काम करणारे पाच मजूर जखमी झाले आहेत . जखमीना धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसिलदार प्रकाश म्हेत्रे व तलाठी श्री. पालखे यानी भेट देऊन पंचनामा केला.