

Dharashiv District administration ready for Ashadhi Wari
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीसाठी धाराशिव जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या पालखी दिंडींच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना सुरक्षित, सुलभआणि सुविधायुक्त प्रवास मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पालखी मार्गावरील सुविधा, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, पोलिस उपअधीक्षक (गृह) सुरेशकुमार राऊत, कळंबचे उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, महावितरणचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच तसेच पालखी दिंडी प्रमुख ऑनलाइन सहभागी झाले होते.
नीलेश काळे यांनी मार्गदर्शन करताना पालखी मार्गावरील नगरपालिका व ग्रामपंचायतींनी विसावा आणि मुक्कामस्थळी सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले. वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाण्याच्या स्रोतांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छ शौचालये, अखंड वीजपुरवठा आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालखी मार्गावरील अन्नपदार्थांच्या स्टॉलची नियमित तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने स्वतंत्र पथके कार्यरत ठेवावीत. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ते बदल करून त्याबाबत नागरिकांना पूर्वकल्पना द्यावी.
तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आणि मुक्कामस्थळी पोलिस बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रत्येक मुक्कामस्थळी आरोग्य तपासणी शिबिरे, फिरती शौचालये, महिलांसाठी 'हिरकणी कक्ष' आणि नियंत्रण कक्ष उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आरोग्य सेवा तत्पर ठेवण्यावरही भर देण्यात आला.
पालखीप्रमुखांनी मांडल्या सूचना
निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कोणत्याही पालखी दिंडीची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत विविध पालखी प्रमुखांनी आपल्या दिंडींसाठी आवश्यक असलेल्या सुविधा व सूचना मांडल्या. त्यानुसार संबंधित विभागांनी तयारीचा आढावा सादर केला.