

परंडा : परंडा शहरात अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने येत असलेल्या एका इसमावर परंडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १४ ग्रॅम ५१० मिली ग्रॅम वजनाची 'एमडी' (मेफेड्रोन) पावडर जप्त केली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची बाजारपेठेत किंमत सुमारे २,१७,६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
परंडा ते मुंगशी रोडवरील गफार मुजावर यांच्या शेताजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली. यावेळी मोटार सायकल (क्र. MVB-7181) वरून येणाऱ्या एका संशयिताला थांबण्याचा इशारा केला. तो न थांबता पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यास अडवून ताब्यात घेतले.तपासणी केली असता, आरोपी बालाजी नवनाथ सोनवणे (वय ४५, रा. गारभवानी, इंदिरा नगर झोपडपट्टी, परंडा) याच्या शर्टच्या खिशात पॉलिथिनच्या २० लहान पुड्यांमध्ये लपवून ठेवलेली एमडी पावडर मिळून आली. पोलिसांनी अमली पदार्थासह १५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल, असा एकूण २,३२,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.