

परंडा (जि. धाराशिव), : शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व धाराशिव येथील दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष समाधान खुळे व त्यांचे बंधू प्रदीप खुळे यांच्या बावची चौक परिसरातील तीन गोदामांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत १ कोटी १ लाख ८८ हजार ५०८ रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला.
तसेच दाऊद फकीर पठाण (रा. हैदर अली रोड, परंडा) यांच्या गोदामातून ७८ हजार ७५५ रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रोहित दिनेश फंदी यांनी फिर्याद दिली असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली.
या पथकात दक्षता विभागाचे धनंजय आघाव, सुमित खांडेकर, अभिजीत झिंगर, ऋषीकेश मते, अभिजीत झोडगे यांच्यासह पुणे, सोलापूर, सांगली व धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी सहभागी होते. धाडीत मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा साठा उघडकीस आला असून अवैध गुटखा विक्री व साठवणुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे परंडा शहरातील अवैध गुटखा व्यापाराला मोठा फटका बसला असून संबंधित व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.