

उमरगा : उमरगा स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला धाराशिव जिल्ह्यातून एक वर्षा करीता तडीपार करण्यात आले आहे. दरम्यान दिड महिन्यात तिस-या सराईत गुंडाला तडीपार केल्याने गल्ली बोळातील फाळकूट दादांचे धाबे दणाणले आहेत.
शहरासह आजूबाजूच्या परिसरातील लोकांना प्रशांत अशोक पुरातले (रा काळे प्लॉट, उमरगा) हा त्यांच्या साथीदारासह नागरिकांना क्षुल्लक कारणावरून भांडण आणि मारहाण करायचा. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल जरब बसविण्यासाठी मारहाण, जिवे मारण्याची धमकी, धारधार शस्त्राने ठार मारणे, महिला व मुलींचा विनयभंग तसेच धार्मिक भावना भडकावने आदी प्रकारचे कृत्य वारंवार करीत होता. या सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तरीही त्यांच्या गुन्हेगारी कृत्यात काही फरक पडला नाही. पुन्हा अशा प्रकारच्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
नागरिक त्यांच्या दहशतीमुळे तक्रार द्यायला घाबरत होते. त्यामुळे सर्वसामान्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने धोकादायक असणार्या प्रशांत पुरातले याच्या तडीपारीचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी गणेश पवार यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून प्रशांत पुरातले याला एक वर्षांसाठी धाराशिव जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले. त्यानूसार उमरगा पोलिसांनी प्रशांत पुरातले याला ताब्यात घेत धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करीत लातूर येथे सोडून दिले.
उमरगा शहर व परिसरातील गुंडांच्या विरोधात पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी कारवाईचा फास आवळायला सुरू केले आहे. मागील महिन्यात दोन सराईत गुंडाना एका वर्षासाठी धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार केले होते. तर सोमवारी आकाश पुरातले याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. दिड महिन्यात तीन सराईत गुंडाना तडीपार केल्याने पोलीसांच्या रडारवर येण्याच्या भीतीने फाळकूट दादांसह अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
धाराशिव जिल्हा तसेच उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार करण्यात आलेली व्यक्ती दिसली तर तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे. गावगुंडाचा त्रास असेल तर कसलीही भिती न बाळगता नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत.
अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक