कळंब : कळंब शहरातील प्रभात लॉजवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनैतिक मानवी व्यापार (वेश्या व्यवसाय) सुरू असल्याचे उघडकीस आले.या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, तिघांविरुद्ध कळंब पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, गस्तीदरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कळंब येथील प्रभात लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका बनावट ग्राहकामार्फत माहितीची खातरजमा करून सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लॉजवर छापा टाकला. कारवाईदरम्यान लॉजमध्ये दोन महिला आढळून आल्या.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, समाधान महादेव कांबळे रा.इंदिरानगर कळंब, अमोल राजाभाऊ सोनटक्के वय ३६,रा.हासेगाव, ता.कळंब आणि नरेश खेमराज जोशी रा. बसस्थानक समोर, कळंब यांनी संबधित महिलांना आश्रय देऊन या त्यांना वैश्या व्यवसाय करावयास लावले जात होते. ते या व्यवसायातून स्वतःची उपजीविका करत असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन,नोंदवही (रजिस्टर),रोख ६,२०० रुपये,तसेच निरोधाचे पाकीट असा एकूण १६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संबंधित दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रितु खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकाने १३ जुलै रोजी अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना ही कारवाई केली.