

उमरगा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हिप्परगाराव वाडी शिवारात गांजाची बेकायदेशीर शेती फोफावल्याचे उघड झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अंमली पदार्थ विरोधी पथक आणि उमरगा पोलिसांनी शुक्रवारी (दि. ९) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल ६ क्विंटल ४२ किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे ३ कोटी २४ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे. शेतजमीन आणि शासकीय गायरानावर गांजाची लागवड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाला हिप्परगाराव वाडी शिवारातील शेतजमीन आणि शासकीय गायरानावर गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने उमरगा पोलिसांशी संपर्क साधत संयुक्त कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार दोन स्वतंत्र पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. पहिल्या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कन्हैया भांगे यांच्या सर्व्हे क्रमांक ४७/१३ मधील शेतात छापा टाकला.
येथे बेकायदेशीरपणे लागवड केलेली पाच ते सहा फूट उंचीची गांजाची झाडे आढळली. त्यांचे एकूण वजन ३ क्विंटल ४४ किलो असून, किंमत सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या कारवाईत उमरगा पोलिसांनी याच शिवारातील शिवाजी यंपाळे यांच्या घराजवळील शासकीय गायरान जमिनीवर छापा टाकला. इतर झाडांच्या आडोशाला गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी येथून २ क्विंटल ९८ किलो वजनाचा, सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
सीमावर्ती भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांजाची शेती आढळल्याने बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या लागवडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, हनुमान पूरक, वाहिद मुल्ला, म पो हेकॉ शैला टेळे, सुरेश राऊत, कैलास गाडेकर, तर पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, पांडुरंग कन्हेरे, पोउपनि रामहरी चाटे आदिसह पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
गांजाची शेती फोफावली; बीट अंमलदार डिबी पथक अनभिज्ञ? कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
हिप्परगाराव वाडी शिवारात तूर आणि सोयाबीन सोबत तब्बल तीन ते चार महिन्यांपूर्वी गांजाची लागवड झाल्याचा प्रकार संभाजीनगरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत उघड झाला. मात्र, येथील गुन्हे प्रकटीकरण पथक आणि संबंधित बीट अंमलदारांना चार ते पाच उंच गांजा शेतीची भनक कशी लागली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शेत शिवारात नेमके काय सुरू आहे, याची माहिती ठेवण्याची जबाबदारी कुणाची ? की स्थानिक यंत्रणे च्या नजरेखालीच हा अवैध धंदा फोफावत होता? अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेली गुप्त माहिती स्थानिक पोलिसांना का मिळाली नाही, यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बीट अंमलदाराच्या भूमिकेचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.