

Murum youth death Banjara reservation demand
धाराशिव : बंजारा समाजातील एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मुरूम शहरात आज (दि.१३) सकाळी घडली आहे. नाईक नगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मुरूम येथून जवळच असलेल्या नाईक नगर येथील पदवीधर युवक पवन गोपींचद चव्हाण याने आज सकाळी अकरा वाजता राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिंतूर (ता. जालना) येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनात दोन दिवस जाऊन सहभाग घेतला होता. त्यानंतर कालच तो नाईक नगर येथे आला होता. आपल्या मित्रांना तो या आरक्षण विषयी जनजागृती करत होता.
आज सकाळी उठून तो जिंतूर येथे जाण्यासाठी तयारी करीत असतानाच अचानक पणे त्यांनी आपल्या राहत्या घरातील बांबूला गळफास घेत जीवन संपविले. तत्काळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटना स्थळी धाव घेतली असता मृताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यात त्यांनी लिहून ठेवले आहे की हैद्राबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यावे, अशी मागणीचे पत्र आढळून आल्याचे सांगण्यात आले.
मयत पवन गोपींचद चव्हाण हा लातूर येथील शाहू कॉलेज मध्ये बी कॉम पदवी शिक्षण घेतले असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्याच्या पश्चात आई -वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.