

धाराशिव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात मंगळवारी (दि. 14 एप्रिल) उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायांची मोठी गर्दी उसळली होती.
शुभ्र वस्त्रे परिधान करून डोक्यावर निळी टोपी, हातात निळे तसेच पंचशील ध्वज घेऊन अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. सकाळी बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुतळा परिसरात अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी थंड पेय तसेच आईस्क्रीमचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. शहरातील अनेक रिक्षा व वाहनांवर निळे ध्वज फडकत असल्याने परिसर निळामय झाला होता.
यावेळी जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, नगराध्यक्ष नेहा काकडे, आमदार कैलास पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, गटनेते अमित शिंदे, ज्येष्ठ नेते धनंजय शिंगाडे, अखिल भारतीय मराठा नाट्य परिषद शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, नगरसेविका अर्चना शिंगाडे, शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, अभिजित पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी चारनंतर शहरातील विविध भागांतून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. लेसर लाईट शो आणि डॉल्बीच्या दणदणाटात कार्यकर्ते बेभान होऊन नृत्य करत असल्याचे चित्र पहायला मिळाले. एकूणच, सामाजिक समता व बंधुतेचा संदेश देणारी ही जयंती धाराशिव शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.