Dharshiv Accident | पोकलेन अंगावर गेल्याने मजुराचा मृत्यू; उळूपमध्ये संतापाचा उद्रेक!

आर्थिक मदत व न्याय मिळेपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची ग्रामस्थांची भूमिका
Dharshiv Accident | पोकलेन अंगावर गेल्याने मजुराचा मृत्यू; उळूपमध्ये संतापाचा उद्रेक!
Dharshiv Accident | पोकलेन अंगावर गेल्याने मजुराचा मृत्यू; उळूपमध्ये संतापाचा उद्रेक!
Published on: 
Updated on: 

भूम : कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूम तालुक्यातील उळूप येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर गेल्याने अशोक बाळासाहेब सानप (वय ३०) या मजुराचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. २) दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आर्थिक मदत व न्याय मिळेपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी घेतली आहे.

अशोक सानप हे मागील दीड ते दोन वर्षांपासून संबंधित कंपनीकडे पाइपलाइनच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे. कंपनीने मृताच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करून परवाना रद्द करावा, तसेच दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

घटनेनंतर सात तास उलटूनही कंपनीकडून मदतीबाबत ठोस निर्णय किंवा चर्चा झाली नसल्याचा आरोप सरपंच विनोद वराळे यांनी केला. मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह जागेवरून हलविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मृताचा भाऊ मदन सानप यांनी, "आमचा भाऊ दीड ते दोन वर्षांपासून या कामावर मजूर म्हणून कार्यरत होता. त्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून, आम्हाला न्याय मिळावा," अशी मागणी केली. दरम्यान, भूम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांचे पालन झाले होते का आणि दुर्घटनेला जबाबदार कोण, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.