

Deal worth Rs 2 crore in Mumbai before road work is approved
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: धाराशिव नगर परिषदेकरिता मंजूर झालेल्या तब्बल १४० कोटी रुपयांच्या निधीवरून आता राजकीय वादळ उठले आहे. या निधीच्या कामांमध्ये भ्रष्टाचाराचा प्रयत्न होत असल्याचा घणाघात आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. भारतीय जनता पक्षाचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्यावर लाडक्या गुत्तेदाराला रस्त्याचे काम १५ टक्के जादा दराने देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाप्रमुख सूरज साळुंके म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे प्रथमच धाराशिव नगर परिषदेला १४० कोटींचा निधी मंजूर झाला. शहरातील ५९ रस्त्यांची कामे या निधीतून होणार असून त्यात काही मंडळी अडथळा निर्माण करत आहेत.
या ठेकेदारी कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी मुख्याधिकारी आणि गुत्तेदार यांची मुंबईत बैठक घेऊन तब्बल २ कोटी रुपयांची रोख डील झाल्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वापूर्वी पूर्ण झालेल्या रस्त्यांचेच पुन्हा टेंडर काढले जाणे हे निधीचा दुरुपयोग असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी शिवसेनेचे संघटक सुधीर पाटील, शहरप्रमुख आकाश कोकाटे, डी, एन, कोळी उपस्थित होते. भाराशिय शहरातील अंतर्गत रस्त्यांची काही कामे यापूर्वीच झालेली आहेत, तरी देखील त्याच रस्त्याच्या कामाचे टेंडर पुन्हा काढण्याचे कारण काय? असा सवाल करीत निधीचा दुरूपयोग करण्याचे पाप नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि भाजपा, उबाठा गटाचे लोक करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे शहराचा सत्यानाश केला, आगामी निवडणूक समोर ठेवून सुरू असलेला हा खेळ जनता ओळखून आहे. त्यामुळे असे राजकारण चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहराच्या विकासाला प्राधान्य देत शिव-सेना लवकरच फेरनिविदा काढून कामांना गती देईल, असेही साळुंके यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देणार असल्याचेही जाहीर केले.