

Cow Rescue Umarga
उमरगा : नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी खोल आणि अरुंद गटारात अडकलेल्या एका गायीची सुमारे अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका केली. कोणत्याही प्रकारचे आधुनिक यंत्र किंवा जेसीबीचा वापर न करता केवळ दोरी आणि सामूहिक मनुष्यबळाच्या साहाय्याने हे बचावकार्य यशस्वी करण्यात आले. या कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एकोंडी रोड परिसरातील खोल आणि अरुंद गटारात मंगळवारी (दि. १०) सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक गाय चुकून पडली होती. गटारातून बाहेर पडण्यासाठी योग्य जागा नसल्याने गायीला स्वतःहून बाहेर येणे शक्य होत नव्हते. गटारातील चिखल आणि घसरड्या परिस्थितीमुळे ती अधिकच त्रस्त झाली होती.
ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक भैरवनाथ काळे यांना तात्काळ माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी स्वच्छता विभागाला तातडीने बचावकार्य करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्वच्छता निरीक्षक विकास दनाने आणि मुकादम उद्धव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
गटारातील गायीची अवस्था पाहून यंत्रसामग्रीची वाट न पाहता कर्मचाऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने गायीला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. दुर्गंधी, चिखल, अरुंद जागा आणि भेदरलेली गाय अशा प्रतिकूल परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी धैर्य आणि जिद्दीने बचावकार्य सुरू ठेवले. अखेर सुमारे अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी गायीला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढले.
या बचाव मोहिमेत शंकर सोनकांबळे, विकास बनसोडे, लक्ष्मण सुरवसे, धनराज सुरवसे, शाहूराज कांबळे, अनिल खंडागळे, आनंद सुरवसे, रोहित दुनगे आणि तुळशीदास कटके यांनी सहभाग घेतला.
कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक
कोणत्याही यांत्रिक मदतीशिवाय केवळ कौशल्य आणि शारीरिक श्रमाच्या जोरावर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गायीचे प्राण वाचवले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एका मुक्या जीवाला जीवदान मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.