

उमरगा : मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष आणि शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'सामुदायिक आरोग्य शिबीर' व 'निरामय धाराशिव विशेष अभियान' राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. १७) बैठकीत अभियानाच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. उमरगा लोहारा तालुक्यात पुढील आठवड्यात आरोग्य शिबीर पार पडणार आहे.
बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, मुख्यमंत्री साहाय्यता निधी राज्य समन्वयक डॉ. स्वानंद सोनार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाळळकर, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेचे सह अध्यक्ष शरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जि प सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, आकाश इंगळे, आरोग्य शिबीर समन्वयक डॉ. श्रीराम पेटकर आदी उपस्थित होते.
बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील वाढत्या आरोग्य समस्या तसेच गेल्या काही वर्षांत महिलांमधील स्तन व गर्भाशय मुखाचा कॅन्सर तसेच पुरुषांमधील मुख व फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगार, एकल महिला, घरकामगार व दुर्गम भागातील नागरिकांसाठी हे अभियान विशेषत्वाने राबवले जाणार आहे. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात शनिवारी (दि. २५) आरोग्य शिबीर पार पडणार आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात मोफत निदानात्मक चाचण्या घेऊन संभाव्य रुग्णांची लवकर ओळख करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात गरजूना राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे मोफत शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या अभियानामुळे आजारांचे लवकर निदान होऊन गंभीर आजारांवर वेळेत उपचार शक्य होणार आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सेवा मिळाल्याने त्यांचा उपचाराचा खर्च कमी होणार आहे. नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवून जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक सुधारण्यास हे अभियान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, 'निरामय धाराशिव कृतीदल' स्थापन करून शासन, शरण पाटील फाउंडेशन, सेवाभावी संस्था आणि स्थानिक पातळीवरील समन्वयातून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून निरोगी समाज घडविण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास शरण पाटील यांनी 'दै. पुढारी' शी बोलताना व्यक्त केला.