

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२९) तुळजाभवानी मातेचे विधिवत पुजा करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कवड्याची माळ घालून स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भवानी शंकराचे दर्शन घेतले व तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार व ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचे अनावरण केले. आई तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य आणले. त्या पद्धतीने राज्य कारभार चालावा, आईने आम्हाला आशीर्वाद दयावा, असे साकडे देवी चरणी घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत 'मित्रा'चे उपाध्यक्ष, आ. राणाजगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व पोलीस अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते.
फडणवीस यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची पाहणी केली व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी आ. अभिमन्यू पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, दत्ता कुलकर्णी यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते.